28.8 C
मालेगाव
July 8, 2020
Home » ओमकार कॉलोनी शिरपूरचे सांडपाणी व विना परवाना बांधकाम पोहोचले थेट मंत्रालयात!
आपला जिल्हा महाराष्ट्र मालेगांव वाशिम

ओमकार कॉलोनी शिरपूरचे सांडपाणी व विना परवाना बांधकाम पोहोचले थेट मंत्रालयात!

सांडपाण्यासोबतच विना परवाना बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर

प्रतिनिधी/शिरपूर दि.२८ जून
स्थानिक ओंकार कॉलनी वार्ड क्रः 3 मधील मराठी शाळेजवळ सांडपाण्याची फार मोठी गटारगंगा साचली आहे. याप्रकरणी मंत्रालयाकडे दिलेल्या तक्रारीत गटारगंगेच्या मुद्द्यासोबत विना परवाना बांधकामाचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर आला आहे. सांडपाण्याचा मुद्दा पेटवताना विना परवाना बांधकामाचा मुद्दा सुद्धा भडकला आहे. त्यामुळे कॉलीनीतील अनेक रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
 स्थानिक ओंकार कॉलनी ही नवीन वसाहत आहे. कॉलनी निर्माण झाली त्यावेळी नगर रचना विभागाच्या आदेशानुसार लेआऊट मालकाने नाल्या, रपटे तयार करुन संपूर्ण सांडपाण्याची व पावसाच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली होती. त्यामुळे ओमकार कॉलीनीची एन ए अॉर्डर, लेआऊट नकाशा, शेत सर्व्हे नंबर नकाशा व पावसाच्या पाण्याची वहीवाट इत्यादी बाबींची बारकाईने पाहणी केल्यास हा प्रश्न चुटकी सरशी निकाली निघूनही जाईल.
परंतू दि.२६ जुन रोजी ओंकार कॉलीनीतील रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीने एका वेगळ्याच संकटाला आमंत्रण दिले आहे.ग्राम विकास मंत्री, जिल्हाधिकारी तथा नगर रचना विभागाला दिलेल्या या तक्रारीत विना परवाना बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.कारण ग्राम पंचायतकडून बांधकामाची लेखी परवानगी घेण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. या प्रक्रियेत प्लॉट मालकीची कागदपत्रे, एन ए अॉर्डर,ले आऊट नकाशा, ग्रा.पं.ची कर पावती व सोबत बांधकामाचा आराखडा (ब्लू प्रिंट) इत्यादी कागदपत्रांची फाईल ग्रामपंचायतला सादर करायची असते. त्यानंतर ग्रामपंचायतने तो प्रस्ताव सभेत मांडायचा असतो. सभेने ठरावाद्वारे त्या प्रस्तावाला मंजुरात द्यायची असते. मग त्यानंतर ग्रा.पं.ने ते फाईल दप्तरी ठेवून बांधकामाची लेखी परवानगी प्लॉट मालकाला द्यायची असते. अशा कायदेशीर प्रक्रियेला वळसा (बायपास) घालून घेतलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या ह्या अनधिकृत असतात.
स्थानिक ओमकार कॉलीनीतील रहिवाशांकडे अशी अधिकृत बांधकाम परवानगी आहे का? हाच कळीचा मुद्दा या तक्रारीच्या माध्यमातून उपस्थित झाला आहे. पाऊसाच्या पाण्याचा व सांडपाण्याचा मुद्दा उचलत असताना ‘विना परवाना’ बांधकामाचा विषारी साप तक्रारकर्त्यांनी डिवचला तरी कशाला? पायावर धोंडा पाडून घेण्याची ही दुर्बुद्धी सुचली तरी कोणाला? तक्रार तयार करणारी व्यक्ती ही या कॉलीनीतील रहिवाशांची मित्र आहे की शत्रू? तक्रारकर्त्यांपैकी कोणी आपला जुना हिशोब चुकता तर करत नाही ना? असे अनेक प्रश्न या क्षेत्रातील तज्ञ लोक कॉलीनीतील रहिवाशांना विचारत आहेत. तक्रारीच्या निमित्ताने विना परवाना बांधकामाच्या या भस्मासुराने तक्रारकर्त्यांच्याच डोक्यावर हात ठेवला तर, या विचाराने तक्रारकर्त्यांपैकी अनेकांची झोप उडाली आहे. या तक्रार अर्जावर पत्रकार, बँक म्यानेजर, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी व मुख्याध्यापकांची सुद्धा स्वाक्षरी आहे, हे विशेष!
एकूणच सांडपाण्याचा मुद्दा मंत्रालयात नेण्याच्या नादात कॉलीनीतील रहिवाशांचा पाय खोलात गेला की काय? तक्रारकर्त्यांची व कॉलीनीतील रहिवाशांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशी तर होणार नाही ना? याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.शिवाय या प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत काय भुमिका घेते, याकडे सुद्धा शिरपूर वासियांचे लक्ष लागून आहे.


कागदपत्रांची पाहणी करुन ओमकार कॉलीनीतील सांडपाण्याचा प्रश्न तर सोडवला जाईल.परंतू अनधिकृत परवानगीने केलेल्या बांधकामांची किंवा विना परवाना केलेल्या बांधकामांची गय केली जाणार नाही.
सौ.सुनिता गणेश अंभोरे
(सरपंचा, ग्रा.पं.शिरपूर)

या बातम्या वाचा

Leave a Comment