Uncategorized

संत,समाजसुधारक आणि देशभक्तांचे विचारच तरुणांसाठी प्रेरणादायी –
डॉ.ज्ञानेश्वर गाडे


महाराष्ट्रातील संतांनी धास्तावलेल्या मानवी मनाला ऊर्जा देण्याचे कार्य केले.संतांनी मानवी मनाची जडणघडण करून महाराष्ट्राची मानसिकता घडविली.एकोणिसाव्या शतकात समाजसुधारकांनी समाज परिवर्तनासाठी आपला देह झिजविला.पुढे स्वातंत्र्यलढ्यात देशभक्तांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.आजच्या तरुणांना संत,समाजसुधारक आणि देशभक्त यांचे चरित्र,विचार व साहित्यच प्रेरणादायी ठरू शकते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ.ज्ञानेश्वर गाडे यांनी व्यक्त केले.
माँ जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय गुणीजन महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.महासमेलन सोहळ्याचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख श्री.दामूअण्णा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी संस्थेच्या पाठीमागे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ब्रह्मकुमारी मीरादीदी वाडकर उपस्थित होत्या.
डॉ.ज्ञानेश्वर गाडे पुढे म्हणाले की, समाजातील शिक्षण,आरोग्य, समाजसेवा,कृषी आणि उद्योग या पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे हे अतिशय कौतुकास्पद आहे.माँ जिजाऊ फाउंडेशनने हे कार्य हाती घेऊन आजच्या तरुणांनापुढे मोठा आदर्श उभा केला.
यावेळी राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार आदिनाथ पायघन,बळीराम जाधव,हिरकणी पुरस्कार बी.के मीरादीदी वाडकर,युवासमाज रत्न पुरस्कार कृष्णा माने,दीपक वाल्हे,आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार शुभम पांचाळ यांना बहाल करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बोबडे,प्रास्ताविक भारत भालेराव आणि भागवत क्षीरसागर यांनी मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.भारत भालेराव, सचिव ज्ञानेश्वर पवार संस्थेचे सदस्य राहुल बोबडे,गोपाल धोंडगे,राजू बोबडे,नारायण टेकाळे,यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!