Uncategorized

महिलांनो, विधवा प्रथेचे जोखड झुगारा- सरोज पाटील

वाळवा तालुक्यातील सरपंचानी विधवा प्रथेविरुद्ध जास्तीत जास्त ठराव करुन तालुक्यातील क्रांतिकारकांची पुरोगामी परंपरा पुढे न्यावी.
महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर च्या वतीने विधवा महिलांच्या पाल्यांना मोफत स्पर्धा परीक्षा क्लास
२६ जून पर्यंत सांगली जिल्ह्यातील विधवा प्रथेविरुद्ध ठराव करणार्या ग्रामपंचायतचीचा अंनिसच्या वतीने सन्मान करणार.

प्रतिनिधी आकाश जगदाळे

सांगली :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन    समिती,प्रा.एन.डी.पाटील प्रतिष्ठान आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज ढवळी ता.वाळवा येथे बागणी पंचक्रोशीतील सरपंचाची बैठक पार पडली. या बैठकीस परिसरातील १८ गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विधवा भगिनींच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून अभिनव पद्धतीने केली गेली.

या सरपंच बैठकीला मार्गदर्शन करताना अंनिसच्या राज्य अध्यक्ष सरोजमाई पाटील म्हणाल्या की, हेरवाड गावाने विधवा प्रथेविरुद्ध ठराव करुन आपल्या समोर आदर्श निर्माण केला आहे. त्याच पद्धतीचा ठराव वाळवा तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीनी करुन वाळवा तालुका हा क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे नेहमी ठामपणे उभा राहतो हे दाखवून द्यावे. ठराव केले नंतर त्याची अमंलबजावणी करणेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. विधवा प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आमचे अंनिसचे कार्यकर्ते आपल्या गावात येवून जनजागृती करतील.

सरोजमाई पुढे बोलताना म्हणाल्या की, महिलांचा आत्मसन्मान नाकारणारी विधवा प्रथा झुगारून दयावी. महिलांनी स्वतः च्या पायावर उभे रहावे. माझे पती एन. डी. पाटील साहेब यांचे निधन झाले नंतर मी कोणतेही प्रथा परंपरा पाळली नाही, तशी एन.डी.सरांचीच इच्छा होती.

वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथेविरुद्ध काढलेले परिपत्रक विधवा भगिनींचा सन्मान वाढवणारे आहे. या परिपत्रकानुसार तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने ठराव करावेत. यासाठी जी मदत, मार्गदर्शन लागेल ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल.

अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, प्राचीन काळापासून विधवा महिलांना समाजाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. विधवांचा सन्मान नाकारताना त्याला धार्मिक मुलामा चढवला जातो. भारतात अनेक समाजसुधारका़नी विधवा प्रथेविरुद्ध काम केले आहे. तोच वारसा अंनिस पुढे चालवते. विधवा महिला विषयी
समाजात ज्या प्रचलित अंधश्रद्धा आहेत त्या दूर करणेचे काम अंनिसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. विधवा सधवा हा भेदभाव समाजातून नष्ट झाला पाहिजे. शासनाने विधवा प्रथेविरुद्ध काढलेला जीआर हा पुरोगामी विचारांची गावोगावी पेरणी करणेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अंनिस इस्लामपूर चे उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील म्हणाले की, येत्या २६ जून पर्यंत म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती पर्यंत सांगली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर करतील, त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर यांचे वतीने सन्मानित केले जाईल. त्या सर्व ग्रामपंचायतींचा इस्लामपूर येथे जाहीर भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येईल.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते दिपक कोठावळे म्हणाले की, मनुस्मृती मुळे स्रियांना हीनतेची वागणूक मिळत होती, पण फुले शाहू आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांनी मुलींना  शिक्षित केले. महाराष्ट्रातील संतपरपंरेने स्रियांना समानतेची वागणूक दिली. शासनाच्या या जी.आर.मुळे विधवा प्रथा निर्मूलनासाठी हातभार लागणार आहे.

ग्रामसेवक संघटनेचे दादासो पांडुरंग सिंग म्हणाले की, जास्तीत जास्त गावामध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव होणेसाठी ग्रामसेवक संघटना सर्व ती मदत करण्यासाठी तयार आहे.

उपस्थित सर्वांना विधवा महिलांचा सन्मान करणेची सामुहिक शपथ प्रा. एस. के. माने यांनी दिली. यावेळी उपस्थित सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी आमच्या गावामध्ये लवकर विधवा प्रथेविरुद्ध ठराव करु असे आश्वस्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाच्या मुलींनी स्वागत गित गायले.त्याला संगीत शिक्षकांनी सुरेल साथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्लामपूर अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अलका पाटील, डॉ. राजेश दांडगे यांनी तर आभार इस्लामपूर अंनिसच्या अध्यक्षा डॉ.नीलम शहा यांनी मांडले.

या कार्यक्रमास ॲड. एन. आर. पाटील काका (अध्यक्ष, महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर,) बी.ए.पाटील, प्रा. सचिन गरुड, प्रा. संतोष खडसे तसेच ढवळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजन शशिकांत बामणे, राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. माने व त्यांचे सहकारी यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!