कामचुकार तलाठ्यावर कारवाईची मागणी ?
यापूर्वी सुद्धा अनेक वेळा तक्रारी होवूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी संभ्रमात
शिरपूर : शिरपूर भाग २ चे तलाठी प्रभाकर सोमाजी अंभोरे हे मागील ४ महिन्यापासून शिरपूर येथे कार्यालयात आले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर तक्रारी होऊनही त्यांना पाठीशी घालणारे मंडळ अधिकारी घनश्याम दलाल यांचेवर कारवाई केली जावी अशी मागणी तक्रारीद्वारे बुद्धू हसन परसूवाले यांचे सह शिरपूर भाग दोन चे काही शेतकरी यांनी तहसीदार मालेगांव यांचेकडे दिनांक १९ मे २०२२ रोजी केली आहे.
तक्रारीत नमूद आहे कि शिरपूर तलाठी सझा येथे कार्यरत असलेले शिरपूर भाग २ चे तलाठी प्रभाकर सोमाजी अंभोरे हे मागील चार महिन्यांपासून आपल्या कार्यालयात आलेले नाहीत. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यास लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास व इतरही अनेक कार्यालयीन कागद पात्रांची पूर्तता करण्यास अडथळा होत आहे. सदर तलाठ्याच्या यापूर्वी सुद्धा अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत. व वर्तमान पत्रातून त्या बाबत वृत्त सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. अनेक वेळा तक्रारी होवूनही कारवाई होत नसल्याने सदर तलाठी आणखीनच कामचुकार पणा करीत आहेत. व कार्यालयास उपस्थित राहत नाहीत असले तरी दारूच्या नशेत असतात व शेतकऱ्यांना उर्मठ भाषेत बोलतात असेही तक्रारीत नमूद आहे.
तर सदर तलाठ्याचा हा सर्व प्रकार माहित असूनही त्याची पाठराखण शिरपूर तलाठी सझाचे मंडळ अधिकारी घनश्याम दलाल करीत असल्याचा उल्लेख सुद्धा तक्रारीत आहे.
त्यामुळे या तक्रारीवर तरी तहसीलदार काय कारवाई करतात कि पुन्हा केराची टोपली दाखवतात या कडे त्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
कोट – सदर तलाठ्याच्या वर्तनुकी बाबत मी या पूर्वी वेळोवेळी पाच ते सहा वेळा वरिष्ठ कार्यालयात अहवाल दिलेला आहे. मी कुणालाही पाठीशी घालत नसून माझी जबाबदारी मी पार पाडलेली आहे. घनश्याम दलाल मंडळ अधिकारी शिरपूर