Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार

संचारबंदीचे सुधारित आदेश जारी

• सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘होम डिलिव्हरी’ला मुभा

वाशिम, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात आज, २० एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून संचारबंदीचे सुधारित आदेश लागू करण्यात आले असून आता जिल्ह्यातील दवाखाने, मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २० एप्रिल रोजी याबाबतचे आदेश जारी केले असून सदर आदेश १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई, चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी विक्रीची दुकाने, पशुखाद्यांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची दुकाने, दुध संकलन व वितरण सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. याशिवाय ‘होम डिलिव्हरीसाठी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा, त्यासंबंधित इतर सेवा २४ तास सुरु राहतील. स्थानिक खाजगी वाहतूक सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक नियमितरित्या सुरु राहील.

अत्यावश्यक बाबीतील सर्व हार्डवेअर्सची दुकाने व कृषि संबंधित सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषि संबंधित साहित्याची आवश्यकता असेल त्यांनी संबंधित दुकानदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकाने स्वतः ही वस्तू दुकानातून घेवून जावी. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत केवळ त्या वेळेपुरतेच हे दुकान माल, वस्तू देण्याकरिता उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत दुकानदार यांनी दुकानातून मालाची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा, नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीची कार्यालये २४ तास सुरु राहतील. जिल्ह्यातील सर्व कायालये, बँक, एटीएम, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व फळांची दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने बंद राहतील.

परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांना १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच या आदेशात नमूद बाबीं व्यतिरिक्त १४ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशातील इतर बाबी तशाच राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

पेट्रोल विक्रीला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच मुभा

शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंपावर सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंतच पेट्रोल विक्रीला मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, रुग्णवाहिका व मालवाहतुकीची इतर वाहने यांना नियमितरित्या डिझेलची आवश्यकता असल्याने या पंपांवर डिझेल विक्री पूर्वीप्रमाणे नियमित सुरु राहील. मात्र सकाळी ११ वाजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल विक्री करता येणार नाही.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .