शिवजयंती रक्तदानाचा उच्चांक शिरपूरच्या नावावर!

सिमेवर लढणाऱ्या जवानांसाठी… 155 पुरुष व महिला रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिवजयंती निमित्त जिल्ह्यात सर्वत्र रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली होती.परंतू शिरपूरच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने ‘माझ्या रक्ताचा थेंब न थेंब देशाच्या सैनिकासाठी’ या मध्यवर्ती संकल्पनेतून आयोजित केलेले रक्तदान शिबीर प्रचंड यशस्वी ठरले.या रक्तदान शिबीरात सुमारे 155 पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि शिवजयंतीच्या रक्तदानाचा उच्चांक शिरपूरच्या नावावर केला.
१९ फेब्रु रोजी छत्रपती शिवरायांची ३९१ वी जयंती आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी करण्यात आली.त्यानिमित्त शहरात सर्वधर्मीय समाजबांधवांच्या सहभागातून एक सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली होती.या समितीने कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार दि.१९ फेब्रु. ला स्थानिक शिवचौकातील छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राचे ठाणेदार सुनिल वानखडे व सपोनि विजय महाले यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले होते.तर दि.21 रोजी ‘माझा रक्ताचा थेंब न थेंब देशाच्या सैनिकांसाठी’ या संकल्पनेतून रक्तदान शिबीर आयोजित केले होते.या शिबीरात स्थानिक आणि पंचक्रोशीतील 155 पुरुष आणि महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.त्यामुळे शिवजयंती निमित्त जिल्ह्यात झालेल्या रक्तदानाचा उच्चांक शिरपूरच्या नावावर नोंदवला गेला.स्थानिक आरोग्यवर्धीनी केंद्रात संपन्न झालेल्या या रक्तदान शिबीराचे उद् घाटन प्रमिलाताई कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यवर्धिनी केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.तर वाशीम आणि अकोला येथील शासकीय रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाचे कर्तव्य बजावले.या शिबीरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांसाठी ‘मी रक्तदाता’ हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.हा सेल्फी पॉईंट रक्तदात्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.बचत गटांच्या महिलांनी या शिबीरात रक्तदान करुन शहरात एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य,आरोग्यवर्धीनी केंद्राचे आणि वाशीम व अकोला येथील रक्त पेढीचे सर्व अधिकारी तथा कर्मचारी व यांनी कठोर परीश्रम घेतले.