कोरोना इफेक्ट : सलग दुसऱ्या वर्षी सैलानी यात्रा रद्द!
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उभारणार चेक पोस्ट
बुलडाणा, दि. २३ (प्रतिनिधी)परराज्यासह महाराष्ट्रातून एकही भाविक न येण्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश
__________________________________
जगप्रसिद्ध सैलानी बाबांचा यात्रा महोत्सव कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी यात्रा रद्द केल्याचे आदेश काढले. तसेच महाराष्ट्रासह परप्रांतातून एकही भाविक सैलानीत येऊ नये याकरिता जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमध्ये चेक पोस्ट उभारण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्याचप्रमाणे सैलानी बाबा ट्रस्टलाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सैलानी यात्रेत दरवर्षी आठ ते दहा लाख भाविक येतात. मागील वर्षी २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले होते. २८ मार्चला जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. यात्रा भरल्यास लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमध्ये असे रुग्ण असतील आणि त्यांच्यामुळे लाखोंना लागण होण्याच्या शक्यतेचे वृत्त ‘पुण्यनगरी’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही यात्रा प्रशासनाने रद्द केली होती. यंदा २५ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत भरणार होती. मात्र, तत्पूर्वीच जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा स्थगित केली. यंदाही लाखोंच्या संख्येने भाविक आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. भारतीय साथ रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार २५ मार्च ते ५ एप्रिल २०२१ या कालावधीत होणारी सैलानी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी काढले आहेत.