…अखेर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला
फेब्रुवारीला पुरुष तर ४ तारखेला महिला आरक्षणाची सोडत
सरपंचपदासाठी देव पाण्यात
सर्वच राजकीय पक्षांसोबतच गावपुढारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीचा निकाल समोर आला. यानंतर इच्छूक उमेदवारांना सरपंच पदाचे डोहाळे लागले. परंतू आरक्षण सोडतीचे घोडे अडल्याने इच्छूकांकडून छुप्यापध्दतीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली. दरम्यान, आरक्षण सोडतीचा मुरूत निश्चित झाल्यानंतर आपल्या प्रवर्गाचे आरक्षण निघावे यासाठी इच्छूक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
(प्रतिनिधी)
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. अखेर जिल्हा प्रशासनाने सरपंच पदाच्या आरक्षणाचा मुहूंत काढला असून २ फेब्रुवारी रोजी पुरुष सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तालुकास्तरावर काढण्यात येणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आदी जागांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. तर ४ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर या पदासाठीच्या महिलांच्या आरक्षणाची सोडत निश्चित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर १५२ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. १८ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा देत मतदारांनी नवख्या तसेच युवा उमेदवारांना पसंती दिली. निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. आरक्षणाबाबत तारीख निश्चित नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत सरपंच पदाचे आरक्षण व एका महिण्याच्या आत पदभार देणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने सरपंचपदाच्या आरक्षणाची तारीख निश्चित केली आहे. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. तर ४ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर महिला सरपंचपदाचे आरक्षण काढले जाणार आहे. ण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. वाशीम तालुक्यात २४, रिसोड तालुक्यात ३४, मालेगाव तालुक्यात ३०, मंगरुळपीर तालुक्यात २५, कारंजा तालुक्यात २८ तर मानोरा तालुक्यात २२ ग्रामपंचायतीसाठीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर होणार आहे.
विघ्नसंतोषी उमेदवार सहलीवर
सरपंचपदासाठी अडून बसलेल्या उमेदवारांनी आपले दबावतंत्र वापरत पॅनलवर निवडून आलेल्या विघ्नसंतोषी उमेदवारांना सहलीवर पाठविण्याचा निर्णय घेतला. मागील आठवड्यापासून या सहलीचा आनंद घेत असलेल्या अशा उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आपल्या गटात कायम ठेवण्यासाठी इच्छूक सरपंच सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चित्र गावखेड्यांमध्ये दिसून येत आहे.