घरोघरी करावा लागणार प्रचार प्रचारासाठी “चार अधिक एक”चे सूत्र !

निवडणुकीसोबत कोरोनाचीही आचारसंहिता
सभा,बैठकांवर बंदी
कोरोना काळातच ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू झाली आहे. निवडणुकीदरम्यान गर्दी होऊन कोरोनाला आमंत्रण दिले जाऊ नये, यासाठी आधीच खरबदारीचा उपाय म्हणून काटेकोर नियम पाळण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. तर उमेदवार व त्यांचे समर्थक, प्रतिनिधींनादेखील नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. जे उमेदवार रिंगणात असतीलत्यांच्यासाठी आधीच प्रचाराचे सूत्र ठरवून देण्यात आले आहे. एक उमेदवार आणि चार प्रतिनिधी असे एक अधिक चार चे हे सूत्र राहणार आहे. रॅली न काढता घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रचार सभा, बैठका घेण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मास्क नसेल तर ठरणार उल्लंघन
कोरोना पसरू नये याची विशेष काळजी निवडणूक विभागाने घेतली आहे. उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी घरोघरी प्रचारास निघाल्यास त्यांच्या तोंडाला मास्क लावलेले जरुरी असणार आहे. विना मास्कचे आढळून आल्यास ते उल्लंघन ठरणार असून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
प्रचार रथ, भोगे गायब; उमेदवारच वाजवणार तोंड
भोंग्याद्वारे प्रचार हे निवडणुकीतील खास वैशिष्ट्य असते. याशिवाय आकर्षक रथ बनवून त्याद्वारेही प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर असतो. मात्र, कोरोनाची अवकृपा असल्याने या निवडणुकीतून प्रचार रथ आणि भोंगे गायब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे उमेदवारांना हात जोडून आपले तोंडच वाजवावे लागणार आहे.
शासन आदेश डावलून कुणी या पद्धतीने प्रचार करताना आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. निवडणुकीच्या नियमित आचारसंहितेचे पालन करावे लागणार असून, प्रशासनाने घालून दिलेली कोरोनाविषयक आचारसंहितादेखील काटेकोरपणे पाळावी लागणार आहे.
ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक होऊ घातली असून, गावागावात इच्छुकांसहविविध पक्ष, संघटना निवडणुकीची रणनीती ठरवण्यात मग्न आहेत. पॅनल कसे असावे, उमेदवार कोण द्यावा, आपल्या उमेदवाराचा निभाव लागला पाहिजे, विरोधक काय खेळी खेळतील याविषयी खलबते केली जात आहे. अर्ज स्वीकारण्याचा श्रीगणेशा २३ डिसेंबरला झाला असून, आणखी तीन दिवस उमेदवारी दाखल करण्यासाठी उरले आहेत. छाननी झाल्यानंतर ४ तारखेला उमेदवारी मागे घेणार त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल आणि तेथूनच खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराचा ‘धुराळा’ उडणार आहे.
निवडणूक प्रचार कसा करावा याची आचारसंहिता ठरवून देण्यात आली आहे उमेदवाराने सोबत चारच जण घेऊन ‘डोअर टु डोअर’ प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसारच उमेदवारांना घरोघरी प्रचार करावा लागणार आहे.
पथकांविषयी आल्या नाहीत गाइडलाइन
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी झोनलनिहाय पथक असते. मात्र, या पथकातील कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा लागतो. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासनाकडून अगदी तोकडा निधी येतो. त्यात सर्व खर्च भागविणे होत नाही. मग गावागावात पथके नेमल्यास भत्ते देणार कोण? असा प्रश्न उपस्थित होते. ही पथके नेमण्यासाठी अजून वरिष्ठांकडून गाइडलाइन आल्या नसल्यातरी स्थानिक निवडणूक विभाग मार्गदर्शन घेणार असल्याचे समजते. तोपर्यंत गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक हे काम पाहतील.