काय खर ! काय खोट? वाचा सविस्तर…. ग्रा.पं.निवडणूकीसाठी उमेदवार किमान 7 वी पास हवा?
निवडणूक आयोगाच्या पत्रावरुन तज्ञात मत-मतांतरे
अनेक उमेदवारांच्या अडचणी वाढल्या
शिरपूर तारीख 27 डिसेंबर
गजानन देशमुख
ग्राम पंचायतचा सदस्य होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने शैक्षणिक पात्रतेसंदर्भात नव्याने निर्देश दिले आहेत.दि.24 रोजी राज्य निवडणूक आयोगाने हे पत्र जारी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून जनतेने निवडणूक आयोगाच्या भुमिकेचे स्वागत केले आहे.तर या पत्रामुळे निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या अनेक उमेदवारांच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या अशा 12234 ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.दि.23 डिसें.पासून नामनिर्देशन ही सुरु झालेले असताना राज्य निवडणूक आयोगाने दि.24 डिसें रोजी ग्रा.पं.सदस्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात निर्देश देणारे पत्र जारी केले आहे.या पत्रात ‘ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 13 मधील पोटकलम 2 अ नुसार नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिनांकास म्हणजे 30 डिसें 2020 रोजी वयाची 21 वर्षे पूर्ण नसलेली आणि 1995 नंतर जन्मलेली परंतू 7 वा वर्ग उत्तीर्ण नसलेली व सदर ग्रा.पं.च्या मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेली व्यक्ती निवडणूक लढवण्यास पात्र नसेल’ असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे सदस्य आणि सरपंच होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक उतावळ्या नवऱ्यांना हळद धुण्याची वेळ येणार आहे.शिवाय अनेक उमेदवारांनी दि.23 रोजीच आप-आपली नामनिर्देशने सुद्धा दाखल केली आहेत.अशा दाखल केलेल्या त्या नामनिर्देशनासोबत शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील सबळ पुरावे जोडलेली नसतील तर ते नामनिर्देशन रद्द होणार का? याबाबत अनेक जाणकारांमधे मत-मतांतरे दिसून येत आहेत.
ग्रा.पं.निवडणूकी नंतर गावोगावी उमेदवार पळवापळवीला, सदस्यांच्या घोडेबाजाराला आणि गटा-तटांच्या भांडण-तंट्यांना फार ऊत येत असतो.या सर्व गैरप्रकारांना लगाम लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सरपंच पदाचे रोस्टर निवडणूकीनंतर काढण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.त्यामुळे धनशक्तीच्या जोरावर सरपंच होऊ पाहणाऱ्या अनेक धनदांडग्यांचा हिरमोड झाला आहे.शिवाय दि.24 डिसें.च्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राद्वारे शिक्षणाची अट घालण्यात आली आहे.त्यामुळे अशिक्षित किंवा अल्पशिक्षीत,कानाखालच्या उमेदवाराच्या आडून आपले उखळ पांढरे करुन घेण्याचा पार्टीचालकाचा प्रयत्न हाणून पाडला जाणार आहे. कारण किमान लिहता-वाचता येणारी,हिशोब समजणारी व्यक्तीच यापुढे ग्रा.पं.सदस्य होऊ शकणार आहे.
शिवाय या शैक्षणिक पात्रतेच्या नविन अटीमुळे पॕनलप्रमुखांना आप-आपले उमेदवार बदलावे लागतील.त्यामुळे वार्डा-वार्डातील मतांचे व जातीय समीकरणे बदलणार आहेत.मतांचे गणित जुळवतांना प्रचंड दमछाक होणार असल्याने या पत्रामुळे राजकारण्यांत नाराजी पसरली आहे. तर शिक्षीत लोकप्रतिनिधी मिळणार असल्याने जनतेने निवडणूक आयोगाच्या भुमिकेचे स्वागत केले आहे.