"हजारो किलोमीटर प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्याप्रमाणे आता माझ्या मूळ घरट्यात स्थिरावलोय !'
सोलापूर : भारताचा वृक्षकोश पूर्ण करण्याचा संकल्प वाढदिवसासाठी केला आहे. हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्याप्रमाणे मी माझ्या मूळ घरट्याच्या ठिकाणी म्हणजे सोलापुरात येऊन स्थिरावलोय, अशी भावना अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली.
श्री. चितमपल्ली हे सोलापुरात परतल्यानंतर त्यांच्या गुरुवारी (ता. 5) होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी “सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, सोलापुरात माझे लहानपण पाच्छापेठ भागात गेले. आता अक्कलकोट रोड भागात मी राहतोय. तेव्हा हा परिसर हरिणांची मोठी संख्या असलेला होता. याच परिसरात मी आता राहण्यासाठी आलो आहे. स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन पुन्हा त्यांच्या मूळ घरी परततात, तोच अनुभव मी सोलापुरात येऊन घेतोय.
वाढदिवसाच्या निमित्ताने भारताचा वृक्षकोश पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्राचा वृक्षकोश पूर्ण झाल्यानंतर देशाच्या वृक्षकोशाचे काम ठरवले होते. त्यामध्ये अनेक भाषांमध्ये असलेली झाडांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्रात वाढत्या लोकसंख्येने जंगलाचे प्रश्न जटिल केले आहेत. हजारो किलोमीटरचे रस्ते व इतर कामांसाठी जी झाडे तोडली जातात तेवढी नवीन झाडे लावण्याचा शिरस्ता लावला पाहिजे. नागरीकरण वाढले तरी मिळेल त्या जागेत झाडे असावीत, हे सहजपणे केले पाहिजे. सिमेंटची घरे असली तरी मिळेल तेवढ्या जागेत झाडे व भिंतीवर पिंपळीवेली यांसारख्या वेली लावून ऑक्सिजनची गरज भागवली जाऊ शकते.
पिंपळ कुळाच्या झाडाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पुणे भागात टाटांनी बांधलेली काही धरणे आहेत. तेथे त्यांनी पिंपळ, वड व उंबर अशा झाडांची लागवड केली आहे. त्या धरणाच्या कॅचमेंट एरियात या झाडांनी नैसर्गिक बदल केला आहे. तेथील धरणात गाळ साचण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. महाराष्ट्रातील इतर धरणांत गाळ कसा वाढतो याचे कारण त्यातून सापडते. इस्रायलने भारतीय झाड उंबराची वाळवंटात लागवड केली. उंबर हे जमिनीतील पाण्याचे झरे वर आणते. त्यांनी उंबराने मिळालेल्या जलपातळीचा उपयोग करत फळांच्या बागा फुलवल्या आहेत. इस्रायलकडून उंबराचा वापर इतक्या चांगल्या पद्धतीने होत असेल तर आपण ते सहज करू शकतो.
शासनाने माझे नाव माझे गुरू डॉ. सलीम अली यांच्यासोबत जोडून माझ्या वाढदिवसापासून पक्षी निरीक्षण सप्ताह साजरा करण्याचे ठरवले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांच्या सहवासात मी वीस वर्षांचा काळ घालवला. अगदी ते फोन करून बोलावत असत व मला पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जात असत, असे त्यांनी नमूद केले.
कोकणात घडलेली एक गोष्ट
पुस्तकामध्ये कधी न लिहिलेल्या गोष्टीबद्दल सांगताना चितमपल्ली यांनी सांगितले, की एकदा कोकणात मालवण भागात आम्ही पक्षी निरीक्षणासाठी पहाटेच्या अंधारात बाहेर पडलो. समुद्र पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी तीच वेळ योग्य होती. नावेत बसल्यानंतर दूरपर्यंत नाव समुद्रात गेली अन् खडकावर आदळली. खलाशाने लाइफ सेव्हिंग जॅकेट घालण्याची सूचना केली. खोल समुद्र व अंधारामुळे कोणतीही मदत मिळण्याची शक्यताच नव्हती. जलसमाधीचा प्रसंग अगदी समोर होता. पण काही वेळातच अचानक खलाशाने तांत्रिक पद्धतीने दुरुस्ती करत आम्हाला सुरक्षित ठिकाणी पोचवले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Source link