शिरपूरचे रिक्त असलेले पोलीस पाटील पद तातडीने भरा – सुशांत जाधव

प्रतिनिधी शिरपूर दिनांक २६ नोव्हेंबर

मागील अनेक महिन्यांपासून शिरपूर जैन येथील पोलिस पाटील पद रिक्त असल्याने शिरपूर येथील नागरिकांना विविध दाखल्यांसाठी शिरपूर पासून जवळच असलेल्या ग्राम करंजी येथे पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता शिरपूर येथील पोलीस पाटलाचे पद तातडीने भरण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्हा सचिव तथा शिरपुरचे माजी सरपंच सुशांत जाधव यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर जैन या महत्त्वाच्या गावात मागील 9 ते 10 महिन्यांपूर्वी पोलीस पाटील चंद्रशेखर नारायण वानखेडे हे सेवानिवृत्त झाल्याने पोलीस पाटलाचे पद रिक्त झाले आहे. या पदाचा पदभार करंजी येथील पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांना पोलीस पाटलाशी निगडित असलेल्या विविध प्रकारच्या कामासाठी शिरपूर पासून पाच किमी अंतर असलेल्या करंजी या गावी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांची खोळंबली जात असून कामात दिरंगाई होत आहे. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था करिता पोलीस पाटलाचे पद फार महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे संवेदनशील म्हणून शासन दरबारी नोंद असणाऱ्या शिरपूर येथील महत्त्वाचे असणारे पोलिस पाटील पद शासनाने तातडीने भरावे अशी मागणी माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव सुशांत जाधव यांनी केली आहे.