घंटागाडीची चावी अल्पवयीनाच्या हाती देऊन चालक गेला, अन् घडली दुर्दैवी घटना
कामठी : सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास छावणी परिसरातील घरासमोर घंटागाडी उभी करून वाहनाची चाबी सतरा वर्षीय वाहकाच्या हाती देऊन चालक अल्पोहार करायला गेला. वाहकाने हलगर्जीपणा करीत घंटागाडी सुरू केली. ही घंटागाडी समोर खेळत असलेल्या एका तीन वर्षीय बालकाला जाऊन धडकली. उजवे चाक बालकाच्या डोक्यावरून गेल्याने तीन वर्षीय बालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत बालकाचे नाव विशू उर्फ लक्ष नीलेश बरसे (रा. हनुमान मंदिरजवळ, प्रभाग क्र. १५, जुनी छावणी कामठी) असे आहे. मृत बालक घंटागाडी चालकाचा पुतण्या असल्याचे सांगण्यात येत असून, वाहक फक्त १७ वर्षीय आहे. यासंदर्भात फिर्यादी अक्षय बरसे यांनी स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी घंटागाडीचालक प्रीन्स उर्फ गोलू प्रीतम बरसे (वय ३०, गौतम नगर छावणी कामठी) याच्यावर गुन्हा दाखल केला. दुसरा आरोपी वाहक बोरियापुराचा रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील या घंटागाडीवर एक वाहनचालक व दुसरा वाहक पगारी स्वरूपात कार्यरत आहे. यानुसार घंटागाडीचा चालक आरोपी प्रिन्स उर्फ गोलू प्रीतम बरसे हा नियमितरित्या आजसुद्धा सकाळपासून कचरा संकलन करीत प्रभाग क्र.१५ येथील रामगढ, सैलाब नगरात भ्रमण करून गौतम नगर येथे येऊन घरासमोर कचरागाडी उभी केली व अल्पोहार करण्यासाठी वाहकाच्या हाती गाडीची चावी सोपविली.
दरम्यान १७ वर्षीय अल्पवयीन वाहकाने गाडीला हलगर्जीने चावी लावून गाडी सुरू केली. गाडी अनियंत्रित होऊन घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालकाला धडक देत वाहनाचा उजव्या बाजूचे चाक त्या बालकाच्या डोक्यावरून गेले. या रक्तबंबाळ स्थितीत बालकाला नजीकच्या रॉय हॉस्पिटलला उपचारार्थ घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने सर्वाना धक्का बसला.
घटनेनंतर घटनास्थळी जमाव गोळा झाल्याने वातावरण तापले होते. मात्र पोलिस निरीक्षक संतोष बाकल, दुय्यम पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंनाके यांनी जमावाला समजूत काढून शांत केले. यासंदर्भात अपघाती वाहन ताब्यात घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल चामले करीत आहेत.
संपादन : अतुल मांगे
Source link