Uncategorized

सेवानिवृत्त प्राचार्यांच्या परीवाराचा कोरोना विरुद्ध असाही लढा!

शब्दांकन : गोपाल वाढे

स्वर्चाने व स्वकष्टाने तयार केलेले २००० मास्कचे केले विनामुल्य वितरण

‘दी जजमेंट’ सदनावर होतोय कौतुकाचा वर्षाव

स्थानिक ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.दत्तात्रय भालेराव यांच्या परीवाराने कोरोनाच्या महामारीत आजपर्यंत सुमारे 2000 मास्कचे विनामुल्य वितरण केले आहे.स्वकष्टाने व स्वखर्चाने बनवलेले मास्क वितरीत करुन भालेराव परीवार अभिनव पद्धतीने कोरोनाशी लढा देत आहे.सामाजिक बांधिलकीच्या या आदर्शपाठाने भालेराव परीवाराचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

          आवड असली की सवड मिळते, या उक्तीप्रमाणे भालेराव परीवार कोरोना महामारीत आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत आहे. स्वतः सेवानिवृत्त प्राचार्य असणाऱ्या प्रा.दत्तात्रय भालेराव यांना चांगले निवृत्ती वेतन आहे. मुलगा डॉक्टर आहे. मुलगी व जावाई डॉक्टर आहेत. घरात कशाचीही ददात नाही. सर्व सुखं पायाशी लोळण घेत असताना प्रा.भालेराव सरांचे अंतःकरण मात्र दुःखीतांच्या दशेने द्रवले.फार काही नाही परंतू दररोज कोरोनाशी लढणाऱ्या लोकांसाठी आपण काही तरी केले पाहिजे.या विचाराने ते झपाटले व त्यांनी आपला हा मनोदय पत्नी सुवर्णमालाताई भालेराव यांना बोलून दाखवला. पत्नी सुवर्णमालाताईंचे कष्ट व पती भालेराव सरांचा पैसा व नियोजन, या सुत्रातून एका नव्या सामाजिक उपक्रमाचा शहरात शुभारंभ झाला. परंतू अद्यापही कुठेच गवगवा नाही की जाहीरातबाजी नाही की सोशल मिडीयावर चमकोगीरी नाही. अस्सल बावनकशी सेवाभावाने त्यांनी या सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. म्हणूनच या उपक्रमाचे मुल्यही तेवढेच अधिक आहे.

               सुवर्णमालाताई भालेराव यांना फार पूर्वीपासून कलाकुसरीची, शिवनकामाची आवड होतीच. त्यांनी यु-ट्युबवरुन मास्क शिलाईची कटाई शिकून घेतली आणि मास्क शिवायला प्रारंभ केला.सुरुवातीला चांगले सुबक मास्क तयार होईपर्यंत २ मीटर कापडाचे मास्क वाया गेले. परंतू त्यानंतर सुवर्णमालाताई भालेराव यांनी दररोज २० ते २५ मास्क याप्रमाणे आजपर्यंत सुमारे २००० मास्क शिवून तयार केले. भालेराव सरांनी सुरेख नियोजन केले व कोरोनाशी रात्रंदिवस लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, बँक कर्मचारी, पत्रकार व व्यापारी यांना प्राधान्य क्रमाने मास्कचे विनामुल्य वितरण केले. अद्यापही भालेराव परीवार मास्कचे विनामुल्य वितरण करतच आहे. मास्कसाठी तलम-सुती कापडाचा वापर केल्याने आजही सर्वत्र त्यांचे मास्क वापरले जात आहेत.

  वयाच्या साठीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम नेकीने व नेटाने करणारे प्रा.भालेराव सर सेवानिवृत्ती नंतरही समाजाला सामाजिक बांधिलकीचे धडे देतच आहेत.त्यामुळे भालेराव परीवाराचे निवासस्थान असलेले ‘दी जजमेंट’ या सदनावर जनलोकांच्या कौतुकाचा अखंड वर्षाव होत आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close