वीज कोसळण्याची वाटते भीती? घ्या ही काळजी
यवतमाळ : शेतकऱ्याचे जीवन काबाडकष्टाचे आणि अनिश्चतेने भरलेले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकट तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेले असते. शेतात राब राब राबल्यानंतर आणि कर्ज घेऊन उभा केलेला पैसा शेतात ओतल्यानंतरही पीक हातात येईल की नाही, याविषयी शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितताच असते. हे ही नसे थोडके म्हणून की काय बिचारा शेतकरी जीवावर उदार होऊनच शेतात राबत असतो. कधी सर्पदंश तर कधी वाघाचे हल्ले तर कधी वीज पडून मृत्यू अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचा जीव नाहक जात असतो.
पावसाळ्यात शेतात कष्ट करीत असताना अनेकदा वीज कोसळून शेतकऱ्यांचे प्राण गेल्याच्या घटना घडतात.
अवकाळीच्या तडाख्यासह पावसाळ्यात विजांचा कडकडाट होऊन शेतशिवारात शेतकरी, शेतमजूर सातत्याने मृत्युमुखी पडतात. आकाशात वीज चमकल्यास तीन किलोमीटर परिसरात ती वीज कोसळण्याची शक्यता असते. वीज पडल्यास काय उपाययोजना कराव्यात, याची पुरेशी माहिती नसल्याने विजांचा कडकडाट जिवावर उठत आहे.
जिल्ह्यात वर्षाला सरासरी दहा मृत्यू होतात. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात विजांचा कडकडाट, वादळ वारा हे समीकरण ठरलेले आहे. वीज अंगावर पडल्याने दरवर्षी शेतकरी, मजूर मृत्युमुखी पडतात. काहींना कायमचे अपंगत्व येते. वीज पडण्याची सूचना मिळण्यासह शासकीय कार्यालय परिसरात वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचे आदेश आहेत. मात्र, बहुतांश कार्यालयात वीज अटकाव यंत्रणा नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय काळजी घ्यावी
ओल्या ठिकाणाहून त्वरित कोरड्या ठिकाणी जाऊन पायाखाली कोरडी वस्तू घेऊन दोन्ही पाय एकत्र करून तळव्यावर बसावे. मोकळ्या आकाशाखाली थांबू नये. खुले मैदान, उंच झाडे यांच्याजवळ थांबू नये. घरात किंवा शेतात, एका जागी गर्दी करून उभे राहू नये, इलेक्ट्रिकच्या वस्तूंपासून दूर रहावे, अशा प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
वर्षनिहाय मृत्यू
२०११-२१
२०१२-०६
२०१३ -१५
२०१४-२२
२०१५-०६
२०१६-१५
२०१७-१५
२०१८-०७
२०१९-१०
२०२०-०४
संपादन – स्वाती हुद्दार
Source link