Uncategorized

"माणिकचमन' या द्राक्ष वाणाचे निर्माते त्र्यंबक तात्या दबडे 

सोलापूर ः काही माणसे काम थोडे पण, प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करताना पाहायला मिळतात. तर काही माणसे काम करण्यात पुढे तर प्रसिद्धीपासून चार हात लांबच असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. असेच प्रसिद्धीपासून चार हात लांब असलेले व्यक्तिमत्व म्हणजे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील त्र्यंबक (तात्या) दबडे होय. द्राक्षाच्या “माणिकचमन' या जातीचा तात्यांनी लावलेला शोध द्राक्ष शेतीमध्ये क्रांतीकारी ठरला. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या स्थापनेमध्ये तात्यांचा मोठा वाटा होता. उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत तालुकाध्यक्ष होते. 

नान्नज (ता. उत्तर सोलापूर) या गावाचे नाव घेतले की द्राक्ष शेती डोळ्यासमोर येते. द्राक्षाच्या बाबतीत मोठे उत्पादन घेणारे गाव म्हणून त्या गावची ओळख. त्या गावामध्ये त्र्यंबक दबडे यांनी “माणिकचमन' या द्राक्षाच्या नव्या वाणाची निर्मिती केली. तात्यांचे थोरले बंधू असलेल्या माणिक यांच्या नावावरुन द्राक्षाच्या त्या जातीला “माणिकचमन' हे नाव दिले गेले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजाना निर्माण करुन देणाऱ्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या स्थापनेमध्ये व त्याच्या जडणघडणीमध्ये तात्यांचे योगदान मोठे आहे. 1960 साली राज्यातील शेतकऱ्यांसाठी द्राक्ष बागायतादर संघाची स्थापना झाली. त्यावेळी जी नऊ माणसे होती, त्यात तात्यांची भूमिका अतिशय महत्वाची होती. नान्नज परिसरात द्राक्षाचे उत्पादन वाढविण्यावर तात्यांनी भर दिला. राज्यासाठी सुरु केलेल्या द्राक्ष संघाची सोलापूर विभागात शाखा असावी, असे तात्यांना वाटले व त्यांनी सोलापूर येथे या विभागासाठी शाखा सुरु केली. सोलापूर विभागातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन, औषधांचा पुरवठा, मार्केटिंगची माहिती, चर्चासत्राद्वारे माहिती देण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र करत त्यांनी दत्तकृपा द्राक्ष उत्पादक संघाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या रोपट्याला वटवृक्षात रुपांतर करण्याचे मोठे काम तात्यांनी केले. शेती क्षेत्रामध्ये आपल्या कामाची किर्ती त्यांनी सातासमुद्रापार पोचविली होती. 

तात्यांचे ज्याप्रमाणे शेतीमध्ये योगदान होते, त्याचप्रमाणे समाजकारण, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांना आवड होती. गावात यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शाळा सुरु केली. संस्थेच्या स्थापनेपासून ते तात्यांच्या मृत्यूपर्यंत ते संस्थेचे सचिव म्हणून काम पाहात होते. शाळा सुरु करण्यासाठी तात्यांनी स्वःताची जागा शाळेसाठी देऊ केली. नान्नज येथील (कै.) गंगाराम घोडके सरकार यांच्या खांद्याला खांदा लावून तात्यांनी काम केले. जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांची खंबीर साथ नेहमीच तात्यांना मिळाली. तात्यांनी अनेक गोरगरिबांचे संसार उभे केले. राजकारण व शेती करत असताना त्यांनी अनेकवेळा परदेश दौरेही केले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय जडणघडणीतही त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विचाराचे पायिक म्हणून तात्यांनी काम केले. पवारांनी समाजवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्यावेळी तात्यांनी अतिशय मनापासून समाजवादी कॉंग्रेसचे काम करुन पवारांना साथ दिली होती. शेती, समाजकारण, राजकारण करत असताना त्र्यंबक दबडे यांनी अनेक पदे भूषविली होती. समाजकारणाबरोबरच त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार, शिक्षण दिले. त्यामुळे तीही त्यांच्या पायावर उभी राहिली आहेत. द्राक्ष निर्यातीसाठी स्थापन केलेल्या “महाग्रेप' या संस्थेवरही तात्यांनी काम केले. द्राक्षाच्या निर्यातीसाठी निर्माण केलेल्या सोलापूर ग्रेप ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 

 


Source link

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close