नागपूरकर दोघांना आवरला नाही गावातील नदीत पोहण्याचा मोह, आणि घडली दुर्दैवी घटना
तिवसा (जि. अमरावती) : नदी म्हटली की अनेकांना तीत डुंबण्याचा मोह होतो. परंतु हाच मोह अनेकदा जीवावर बेतल्याशिवाय राहत नाही. नागपुरातून अमरावती जिल्ह्यात गेलेल्या दोघांनाही सूर्यगंगा नदी पाहताच तीत सूर लावण्याचा मोह आवरला नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, आपली एक चूक जीवावर बेतू शकते, असा कसलाच विचार त्यांनी केला नाही आणि अघटित घडले.
तिवसा तालुक्यातील शेंदोळा ब्रुद्रुक या गावालागत असलेल्या सूर्यगंगा नदीवर पोहण्याकरिता गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, 14 रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे गावात स्मशान शांतता पसरली असून, मृतदेह अमरावतीच्या रेस्क्यू पथकाच्या मदतीने काढून जिल्हा रुग्णालयात श्वाविच्छादनाकरिता पाठविण्यात आले आहेत.
गजानन गजबे, वय 40, व सुरज, रा. नागपूर अशी मृतांची नावे आहेत. गजानन गजबे याचे मूळ गाव शेंदोळा ब्रुद्रुक आहे आईच्या भेटीकरिता आपल्या मित्रासह गावात आले होते. गेल्या काही दिवसांत तालुक्यात चांगला पाऊस झाला. तालुक्यातील नदी, नाल्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील युवक नदीवर पोहण्याचा आनंद लूटण्याकरिता जात आहेत. मात्र हाच आनंद आपल्या जीवावर उठेल याचे भान विसरून पाण्याच्या खोल डोहात जाऊन पोहण्याचा नादात दोघांना आपला जीव गमावा लागला. नागपूरवरून आपल्या आईच्या भेटीकरिता आलेले गजानन गजबे व मित्र सुरज यांनी गावातील सूर्यगंगा नदीत उड्या मारल्या. मात्र पाणी जास्त खोल असल्यामुळे त्यांनी बाहेर येण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही व यातच दोघांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत नांदगाव पेठ पोलिसांनी याची माहिती अमरावतीच्या रेस्क्यू पथकाला दिली काही वेळात मृत्यूदेह बाहेर काढत श्वाविच्छादन करण्या करिता अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
संपादन : अतुल मांगे
Source link