आपल्या वाशिम जिल्ह्यात आजपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानास सुरुवात
वाशिम : सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच त्यातच आपल्या वाशिम जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्णांचा आलेख हा चढताच आहे, सध्या तरी खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय असल्याने हे अभियान महत्वपूर्ण राहणार आहे.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाची पहिली फेरी , १६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत राबविली जाणार आहे.
तसेच दुसरी फेरी १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोंबर या कालवधीत राबविली जाणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २ लाख ४६ हजार ४३२ कुटुंब तसेच शहरी भागातील ४६ हजार ३० कुटुंब संख्येतील एकूण १२ लक्ष ३५ हजार ६५८ लोकसंख्येचे सर्वेक्षण होणार आहे. याकरिता आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांच्या टीम शहरी भागात ९४ टीम व ग्रामीण भागात ९६७ टीम तयार करण्यात आल्या आहेत. ह्या टीम प्रत्येक घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणामध्ये घरातील प्रत्येक सदस्याचे थर्मल गनद्वारे तापमान व पल्स ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन पातळी तपासली जाणार आहे.
सर्वेक्षणादरम्यान एखाद्या व्यक्तींना कोविड-१९ बाबत लक्षणे दिसून आल्यास, तसेच जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची नोंद घेतली जाणार आहे. त्याआधारे आवश्यकता भासल्यास रॅपिड अँटीजेन टेस्ट अथवा घशातील स्त्राव नमुने चाचणी केली जाणार आहे. याकरिता सर्व लोकप्रतिनिधी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.