"मधे आलास तर, तिला पेट्रोल टाकून जाळेन:; युवतीच्या भावाला दिली धमकी
अमरावती ः ती मला आवडते, परंतु तू जर दोघांच्या मधे आलास तर तिला पेट्रोल टाकून जाळून टाकेल, अशी धमकी टवाळखोराने पीडित युवतीसह समजूत काढण्यासाठी गेलेल्या तिच्या भावाला दिली. पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय सुरेश रत्नपारखी (वय 25, रा. न्यू कॉलनी, दस्तूरनगर) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. असे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी रविवारी (ता. आठ) सांगितले.
अक्षय व पीडित युवती दोघांनी शालेय शिक्षण एकाच शाळेत घेतले. अक्षयने पीडित युवतीचा फोटो वापरून तिच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावर पीडितेच्या नावासमोर अक्षयने स्वत:चे नाव व अडनाव लिहिले होते. त्यावर वेगवेगळ्या प्रकारे अश्लील मॅसेज व फोटो पाठवून तिची बदनामी केली. युवतीने आपल्या कुटुंबीयांना त्यासंदर्भात माहिती दिली.
सविस्तर वाचा – सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल
तिच्या भावाने याप्रकाराबाबत अक्षयची भेट घेऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती मला आवडते. आमच्या दोघांच्या मधात आलास तर तिला पेट्रोल टाकून जाळेन, अशी धमकी भावालाच त्याने दिली. फेसबुकसह इन्स्टाग्रामवरसुद्धा तिची बदनामी केली. पीडितेने अखेर यासंदर्भातील तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदवली. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अक्षय रत्नपारखीला अटक केली.
लग्नास नकार दिल्याने युवतीस मारहाण
परतवाडा ठाण्याच्या हद्दीत हनवतखेड्यात संशयित आरोपी कैलास खांडेकर (वय 25) याने युवतीपुढे (वय 22) लग्नाची मागणी केली. नकार दिल्यामुळे तिला बदनामीची धमकी देऊन जबर मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी कैलासविरुद्ध विनयभंग, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सोशल मीडियावरून बदनामी केल्याचे काही तांत्रिक पुरावे तक्रारीसोबत पीडितेने सादर केले. तक्रार गंभीर स्वरूपाची असल्यामुळे युवकाविरुद्ध तत्काळ कारवाई केली.
-पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे.
संपादन – अथर्व महांकाळ
Source link