बापरे! गौळ गावात डेंगीसदृश आजाराचे ११ रुग्ण; गावकऱ्यांत भीतीचे वातावरण
गौळ (जि. वर्धा) : गावात डेंगीसदृश आजाराने डोके वर काढले आहे. खासगी रुग्णालयात उपचाराकरिता गेलेल्या रुग्णांपैकी 11 रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात शासकीय रुग्णालयात मात्र नोंद नाही.
जोपर्यंत रुग्णाची तपासणी सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत होत नाही तोपर्यंत रुग्णाला डेंगीची लागण झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
गावात डेंगीची साथ पसरू नये, याकरिता देवळीच्या सामाजिक संघटनेकडून प्रतिबंधक उपाययोजना आखण्यात येत आहेत.
जाणून घ्या : आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे
नुकतीच गावात बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर कारोटकर, संघर्ष युवा वाहिनीचे किरण ठाकरे, जिल्हा समुपदेशक विजय ओझा, सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू यांनी गावकऱ्यांना डेंगीच्या आजाराची माहिती दिली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मात्र येथे कुठल्याही उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत.
प्राथमिक आरोग्य केंद्र नावालाच
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे; पण त्याचा कुठलाही उपयोग गावाला होत नसल्याचा आरोप होत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गावकऱ्यांनी येथे उपचाराकरिता जाणे टाळणे सुरू केले आहे. याची माहिती वरिष्ठांना असताना त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे.
डेंगीचे रुग्ण म्हणणे चुकीचे
गौळच्या रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतला असून त्यांनी खासगीत तपासणी केली. यामुळे शासनाच्या आदेशानुसार या रुग्णांना डेंगीचे रुग्ण म्हणणे चुकीचे ठरेल. या रुग्णांची जोपर्यंत शासनाच्या सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणी होऊन डेंगीचे निदान होणार नाही तोपर्यंत त्यांनी शासन दरबारी नोंद होणार नाही. असे असले तरी गावात आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
– डॉ. प्रवीण धमाने
तालुका वैद्यकीय अधिकारी देवळी
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
Source link