गर्भवती महिला पतीसोबत दुचाकीने जात होती रुग्णालयात; मात्र टिप्परच्या धडकेत झाला मृत्यू
भंडारा : करचखेडा येथील गर्भवती महिला पतीसोबत दुचाकीने रुग्णालयात तपासणीसाठी जात असताना टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गर्भवती मातेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने मृताला मोबदला व वाळू वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक अडवून मृतदेह उचलण्यास नकार दिला.
यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेवटी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
टिप्परने दिली दुचाकीला धडक
तालुक्यातील बेलगाव येथील दिगंबर किरणापुरे आपल्या गर्भवती पत्नी मनीषाला वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा येथे घेऊन जात होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास करचखेडा येथे पुलाजवळ टिप्पर (क्रमांक एमएच ३६/एए ७२०) चालकाने निष्काळजीपणे दुचाकीला धडक दिली. यात मागे बसलेली मनीषा खाली पडून टिप्परमध्ये आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अवश्य वाचा : थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, दिवाळी हुडहुडी
नागरिकांचे घटनास्थळी आंदोलन
घटनेची माहिती होताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी येऊन सततच्या वाळू वाहतुकीच्या विरोधात संताप व्यक्त करून वाहतूक अडवली. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई, वाळू वाहतुकीवर नियंत्रण करण्याची मागणी करून मृतदेह उचलण्यास विरोध केला. घटनास्थळी तणाव वाढल्याने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी आले. त्यांच्या उपस्थितीत टिप्पर मालकाकडून मृताच्या कुटुंबाला दोन लाख रुपये भरपाई देण्यात आली.
जाणून घ्या : रात्रीच झाला आईचा मृत्यू, तरीही सकाळपर्यंत चिकटून बसले होते पिल्लू
मागण्या मंजूर केल्यावर आंदोलन मागे
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्या मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. टिप्परचालक व मालकावर कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात एम. एन. परशुरामकर तपास करीत आहेत.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
Source link