ब्रेकिंग

येणाऱ्या सर्व निवडणुका समनक जनता पार्टी स्वबळावर लढणार!

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड यांचे प्रतिपादन

वाशिम : ( दि. 13 ऑगस्ट )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड यांनी केली.
स्थानिक पत्रकार भवन येथे दि. 13 ऑगस्ट रोजी समनक जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रामकृष्ण कलापाड पत्रकार परिषदेला संबोधित करतांना बोलत होते.
यावेळी समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला जिल्हाध्यक्ष शितल राठोड हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डॉ. कालापाड पुढे म्हणाले की, जय मानवता, जय संविधान हा नारा घेऊन शोषित, पीडित, ओबीसी, एस सी, एस टी, धार्मिक अल्पसंख्यांक आदींना त्यांचे न्यायिक अधिकार मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सत्तेत पोहोचविण्यासाठी समनक जनता पार्टीचा लोकार्पण सोहळा 9 एप्रिल 2023 रोजी माहूरगड येथे लाखोंच्या उपस्थितीत पार पडला. सद्यस्थितीत राज्यात तसेच देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार केल्या जात आहे. जनतेच्या मालकीच्या विविध संस्था, कारखाने, उद्योग भांडवलदारांच्या घशात घातले जात आहेत. नोकरभरती केली जात नसल्याने लाखो बेरोजगार तयार होत आहेत. सरकारी विभागाचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यामुळे नागरिक देशोधडीला लागला आहे. असे असतांना विरोधी बाकावर बसणाऱ्या विरोधकांचा आवाजही धुसर झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी कोणीही वाली नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून समनक जनता पार्टीची वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या चार महिन्यात पक्षाचे कार्य राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहेत. हे करत असतांना पक्षीय विचारधारेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
नुकतीच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली असून यामध्ये येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार असल्याचे निश्चित केल्याची माहिती डॉ. कालापाड यांनी दिली. निवडणुकांना सामोरे जात असतानाच नागरिकांचे ज्वलंत प्रश्न असलेल्या समस्यांवर तीव्र स्वरूपात आवाज उठविला जाणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये प्रामुख्याने नोकरभरती ही एमपीएससीच्या माध्यमातून घेण्याऐवजी दोन खाजगी एजन्सींना नोकर भरतीचे कंत्राट देऊन परीक्षा फी 364 ऐवजी 900 ते 1000 रुपये द्यावे लागत आहेत. सरकारी रेल्वे स्टेशन विकले, बी एस एन एल विकले, बँकांचे खाजगीकरण इतर अनेक सरकारी कंपन्या भांडवलदारांना विकण्याचा सपाटा लावला आहे. तसेच देशाची हुकूमशाही कडे वाटचाल सुरू केली आहे. आमदारांचे पगार विधानसभेत कुठलीही चर्चा न करता चाळीस हजारांनी वाढविले जातात तर पाच वर्षे पदावर राहिल्यावर सुद्धा आमदार व त्यांच्या पत्नींना पेन्शन दिली जाते. तर दुसरीकडे तीस वर्षे सेवा दिल्यावरही सरकारी नोकरदारांना पेन्शन साठी आंदोलन करूनही त्याची दखल घेतल्या जात नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही आणि रात्री आठ तासच वीज देऊन पैसे मात्र 24 तासांचे घेतले जातात. उत्पादकांना आपल्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार आहे. मात्र, याच धर्तीवर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असावा. मात्र, तोही नाकारला जातो.
मणिपूर राज्यात दोन समुदायात भांडणे लावून महिलांवर अनन्वित अत्याचार घडविले जातात. मात्र त्याची कुठलीही चर्चा होऊ दिली जात नाही. मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे च्या माध्यमातून पोलीस संरक्षणात सभा घेऊन महापुरुषांची तसेच महिलांची बदनामी केली जाते. या व अशा ज्वलंत विषयांवर समनक जनता पार्टी यापुढे रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची घोषणा डॉ. कालापाड यांनी केली.

यावेळी प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी सांगितले की, स्वतंत्र भारताच्या 76 वर्षात कृतीने लोकशाही बळकट करण्यासाठी समनक जनता पार्टीची निर्मिती करावी लागली. समनक म्हणजे समानता प्रस्थापित करणे हाच सरळ उद्देश आहे.
लोकशाहीला अभिप्रेत असलेले लोकांचे महत्त्व न वाढता येथे नेत्यांचे व पक्षाचे महत्त्व मान मोठेपणा वाढीस लागला आणि लोकशाहीचा मूलभूत घटक नागरिक हा सत्ता व संपत्ती पासून कोसो दूर राहिला आहे.
समाजातून पक्ष व नेते तयार होत असतात नेत्यांमधून समाज निर्माण होत नाही हे साधे समीकरण आजचे राज्यकर्ते विसरलेले दिसतात. भारतातील जवळपास सर्वच राजकीय पक्ष समाजाला लाचार गुलाम बनविताना दिसतात. ही लाचारी व गुलामी नष्ट करणे गरजेचे आहे.
या देशाचा कायदा असा सांगतो की, मतदात्यांच्या हक्काची लढाई जनप्रतिनिधींनी सभागृहात लढली पाहिजे परंतु हे जनप्रतिनिधी मतदारांच्या हक्काची लढाई न लढता पक्षाच्या इशाऱ्यावर कामे करतांना दिसतात ही बाब थांबविण्यासाठी समनक जनता पार्टी काम करत आहे.
या देशातील सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांचे मावस भाऊच आहेत. त्यामुळे त्यांच्यातील कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी सामान्य नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. जोपर्यंत जात व धर्मावर आधारित निवडणुका होत राहतील तोपर्यंत खरी लोकशाही रुजणारच नाही. ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करून इथले प्रचलित राज्यकर्ते सत्ता उपभोगत आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीन हटविण्यासाठीही जनआंदोलन उभारावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिक दररोज विविध वस्तू व सेवांच्या माध्यमातून कर भरत असतो मात्र नागरिकांच्या या हक्काच्या पैशावरच राज्यकर्ते डल्ला मारतात. हे कुठेतरी थांबवावे लागणार आहे. यापुढे जात, पात, धर्म, पंथ बाजूला ठेवून निवडणुका लढविल्या जाणार असल्याचे डॉ. राठोड म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी पक्षाच्या वतीने जिल्ह्यात झालेल्या कार्याचा आढावा सादर केला. मणिपूर हिंसाचार प्रकरणी देशात पहिल्यांदाच वाशिम येथे धिक्कार मोर्चाचे यशस्वी आंदोलन केल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण शिबीरे घेवून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून प्रत्येक जात पोटजात व धर्मातील नागरिकांना सत्तेत सहभागी करून घेतले जाणार असल्याचे धामणे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा संघटक संजय वाणी, वाशीम शहराध्यक्ष राजू काळे, राहुल आंबेकर, अजय सोनूनकर, यशवंत पवार, विष्णू राठोड, गोकुळ आडे, प्रा. डॉ. माणिक राठोड आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे

3.7/5 - (4 votes)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे