You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रलाईफस्टाइलशिक्षण व नोकरीसंपादकीय

देशाचे भविष्य रस्त्याच्या कडेला फोडतेय खडी!

बालमजुरीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

शिरपूर दि ०२ मे(प्रतिनिधी)

गोपाल वाढे –

देशातील बालके ही देशाचे भविष्य असतात. बालकांच्या सर्वांगीण विकासातच देशाचे हित असते.हे सत्य असले तरी बालमजूरीने कोवळ्या बालकांना आपल्या पाशात कैद केले आहे, हे वास्तव आहे. याच वास्तवाची प्रचिती शिरपूर शहरात अनुभवायला मिळत आहे.

देशात सर्वत्र निवडणूकांची धूम सुरु आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेदवार आम्हाला संधी दिल्यास ‘सबका विकास’ करु अशा वल्गना करताना दिसतोय. शिरपूर आणि पंचक्रोशीत वास्तव मात्र काही वेगळेच आहे. शिरपूर-पांगरखेड या डांबरी रस्त्याच्या डागडूजीचे काम सुरु झाले आहे. रस्त्याच्या कडेला काळ्या पाषाणाचे ढिग पडलेले आहेत. बाजूच्या शेतात दगड फोडणाऱ्या बायाबापड्यांची पालं उभी राहली आहेत.

प्रस्तूत प्रतिनिधीने सदर कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी फेरफटका मारला असता एक धक्कादायक वास्तव दिसले. १० ते १२ वयोगटातील बालके चक्क खडी फोडताना दिसली! रणरणत्या उन्हात एसी-कुलरमधे जीवाची लाहीलाही होतेय आणि इथे तर चिमुकली मुले चक्क खडी फोडताना दिसून आली.हाती पेन-पेन्सिल घेऊन शिकण्याच्या, बॕट-चेंडू घेऊन खेळण्याच्या आणि बागडण्याच्या वयात ही बालके हाती घण घेऊन पाषाणावर प्रहार करताना नजरेला पडतात. त्यावेळी ‘गरीबी हटाव’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या वांझोट्या घोषणांमधील फोलपणा अजूनच गडद होतो.

गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना खडी फोडण्याची शिक्षा दिली जाते.या चिमुकल्यांचा गुन्हा तरी काय, की ज्यांना आज शिकून सक्षम होण्याच्या वयात खडी फोडावी लागते? बालमजुरी या चिमुकल्या बालकांना आपल्या विळख्यात घेत आहे आणि प्रशासन मात्र गेंड्याची कातडी पांघरूण बसले आहे.त्यामुळे या बालकांचे बिनादिक्कत शोषण सुरु आहे.

गरीबी हटाव, डिजीटल इंडीया, मेक इन इंडीया, स्टार्ट अप, स्टँड अप, स्कील इंडीया सारख्या योजनांचा केवळ गोंगाट ऐकू येतोय. या गोंगाटात जनसामान्यांचा क्षीण आवाज कोणालाच ऐकायला येत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close