महाराष्ट्र

समाजातील गोर-गरीब जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या योजना -पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांचे प्रतिपादन

पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ. - - पात्र कुटूंबांना मिळणार

गजानन तुपकर

तालुका प्रतिनिधी मेहकर

9922477647.

Active न्युज टीम

बुलडाणा दि.19  :  आपआपल्या मिळकतीनुसार समाजात लोक जीवन जगत असतात. अशावेळी अनेकांना पाहिजे ज्या सुख – सुविधा मिळत नाही. परिणामी त्यांच्या मनात कमी पणाची भावना निर्माण होवून असे लोक निराशेच्या गर्तेत सापडतात. तरी समाजातील गोर – गरीब जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या योजना कार्यान्वीत आहेत. योजनांचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज व्यक्त केली.

पंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानातंर्गत शिधापत्रिका व गॅस जोडणी वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियेाजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा सौ. उमाताई शिवचंद्र तायडे, आमदार डॉ शशिकांत खेडेकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक पी. मांगीलाल, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे आदी उपस्थित होते.

धुरयुक्त स्वयंपाक गृहामुळे गृहीणींमध्ये श्वसनाचे आजार वाढत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, गॅस जोडणीमुळे स्वयंपाक घर धुरमुक्त होते. त्यामुळे गृहीणींना श्वसनांच्या विकारांना बळी पडावे लागत नाही. पं. दिनदयाल उपाध्याय अभियानातंर्गत पात्र महिलांना नाममात्र दरात गॅस एजन्सीकडून गॅस जोडणी देण्यात येणार आहे. तसेच पात्र कुटूंबांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. सदर वितरण मोहिम स्वरूपात करायचे आहे. शासनाने यासाठी 15 ऑगस्टची मुदत दिली आहे. कुठलाही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहू नये, याकरीता स्वस्त धान्य दुकानदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेमध्ये 65 हजार 998 कार्डधारक असून 3 लक्ष 7 हजार 3 लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटूंबांमध्ये 3 लक्ष 22 हजार 735 कार्डधारक आहेत. यामध्ये लाभार्थी संख्या 14 लक्ष 84 हजार 955 आहे.

ते पुढे म्हणाले, शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी अनेक निर्णय घेतले. ईपॉस मशीनच्या माध्यमातून दुकानातून धान्याचे वितरण होत आहे. शिधापत्रिकांना आधारशी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे बोगस कार्डधारक बाहेर आले, परिणामी त्यांना जात असलेल्या धान्याची बचत झाली. सदर धान्य प्राधान्य गटातील कुटूंबांना पर्याप्त प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागात 59 हजार रूपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व कुटूंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना अन्नसुरक्षा मिळाली आहे. गोर गरीब लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा. यासाठी कुणीही लाभार्थ्याकडून एक रूपयाही घेवू नये. असे असल्यास तात्काळ संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार करावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.

जिल्ह्यात 42 गॅस एजन्सीद्वारे गॅस जोडणीचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात हिरोळे गॅस एजन्सी, श्री. रेणुका एच.पी गॅस एजन्सी व रामदेव इंडेन चिखली यांच्या लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी प्रास्ताविक केले. संचलन श्री. धुंदळे यांनी, तर आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे यांनी केले. याप्रसंगी स्वस्त धान्य दुकानदार, संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी, संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close